खेड:- लोटे (ता. खेड) एमआयडीसीतील पुष्कर केमिकल अॅण्ड फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीमध्ये चोरी प्रकरणी धडक कारवाई करून सहा संशयितांना अटक केली. खेड पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून ७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ऋतिक रामदास आंब्रे (वय २२, रा. आवाशी, खेड), दर्शन दिलीप गायकवाड (२१, आवाशी माळवाडी), सोहम संतोष आंब्रे (२१, रा. आवाशी मधलीवाडी), साबीर शेख (रा. लवेल), अजिंक्य अजित आंबे (२४, रा. चिरणी खालचीवाडी), दिवेश आंब्रे (२१, रा. चिरणी वरचीवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. लोटे एमआयडीसी मधील पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स प्रा.लि. कंपनीमधील १ जुलैला रात्री चोरी झाल्याचे विकी बालाजी सूर्यवंशी (मुळ रा. लातूर, सध्या खेड) यांनी खेड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या तपासाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाणे अंतर्गत लाटे पोलिस दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. बी. कदम यांना गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे तपास पथक तयार करण्यात आले. यामध्ये सुजित गडदे, सुनील पडळकर, विनायक येलकर, विशाल धाडवे व रुपेश जोगी यांनी शोध सुरू केला. यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई करून सहा संशयितांना अटक केली.
या संशयितांकडून ७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. अटक केलेल्या ऋतिक आंब्रे, दर्शन गायकवाड, सोहम आंब्रे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास डी.बी.कदम करीत आहेत.