७५ हजारांच्या मंगळसुत्रासाठी दापोलीत वृद्धेचा खून

दापोली:- तालुक्यातील विसापूर विश्रांती नगर मधली वाडी येथील दिपावती सिताराम घाग (वय सुमारे ८७) या वृद्ध महिलेची दागिन्यांसाठी हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. वृद्धेच्या छातीवर जोराचा प्रहार करून खून करण्यात आला. याप्रकरणातील संशयित आरोपी सृष्टी संतोष कदम (३७, रा. मधली वाडी, विसापूर, ता. दापोली) या महिलेस दापोली पोलिसांनी अटक केली आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जुलै रात्री ते १७ जुलैच्या सकाळी सात पर्यंत या वेळेत दिपावती घाग या आपल्या घरात पलंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या छातीवर जोराचा प्रहार करून त्यांची हत्या केली गेल्याचे निष्पन्न झाले होते. हत्या केल्यानंतर त्या अज्ञात आरोपीने घाग यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पलायन केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दिपक सिताराम घाग यानी नोंदवली.

या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरू केला. घटनास्थळी आजूबाजूला चौकशी करताना पोलिसांना काही धागेदोरे मिळाले. त्यानंतर संशयित आरोपी सृष्टी संतोष कदम हीच आरोपी असल्याचा दात संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने तपास करताच पोलिसांची या अरोपिबाबत खातरजमा झाली आणि अवघ्या १२ तासात आरोपीला जेरबंद केले. या घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करित आहेत.