५० लाखांच्या सोने चोरी प्रकरणी बँकेच्या शिपायाला पोलिस कोठडी

रत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेत तारण म्हणून ठेवलेले तब्बल 50 लाख रुपयांचे 504.34 ग्रॅम सोने चोरणार्‍या बँकेच्याच शिपायाला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार तासात अटक केली. या सर्व प्रकरणात बँकेचा कॅशियर आणि मुख्य अधिकारी यांंनीही संगनमताने हा गुन्हा केला असल्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हा गुन्हा 18 फेब्रुवारी 2025 ते 4 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली आहे. दरम्यान, शुक्रवारी न्यायालयाने संशयित शिपायाला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमोल आत्माराम मोहिते (42,रा.टिके,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित शिपाईचे नाव आहे. त्याच्या विरोधात बँकेचे सरव्यवव्थापक सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (54) यांनी गुरुवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोने तारण ठेवून ग्राहकांना त्या बदल्यात कर्ज वाटप करण्यात येते. हे तारण ठेवलेले सोने बँकेच्या तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात येते. दरम्यान ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून त्यांचे दागिने परत करुन हा व्यवहार पुर्ण केला जातो.
दरम्यान, कर्ला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सात महिन्यात नागरिकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने बँकेच्या तिजोरीत ठेवताना प्रत्येक नागरिकाच्या दागिन्यांमधील काही दागिने हा शिपाई चोरत होता. परंतू एक नागरिक आपले बँकेत ठेवलेले सर्व दागिने सोडवण्यासाठी बँकेत आला असता त्याला आपल्या दागिन्यांमधील काही दागिने कमी असल्याचे दिसून आले. त्यावेळी या अपहाराचा भंडाफोड झाला. त्याने हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. अपहाराची रक्कमही मोठी असल्याने बँक व्यवस्थापनाने गुरुवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित शिपायाला अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलिस फौजदार दिपक साळवी,पोलिस हेड काँस्टेबल पंकज पडेलकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, अमित पालवे आणि महिला पोलिस शिपाई अमिता पाटील यांनी केली.