३ लाख ६० हजाराची खैराची झाडे चोरणाऱ्या विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- खैराची तोडलेली झाडे स्वतःच्या मालकीच्या जागेतील असल्याचे भासवून तोडलेली ३ लाख ६० हजाराची झाडे चोरुन नेणाऱ्या संशयिताविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पर्शराम गोविंद चौगुले (रा. मुरादपूर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २० ते २१ जानेवारी २०२६ सकाळी नऊच्या सुमारास वाघधरा सातवड मुरादपूर, ता. संगमेश्वर येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बळीराम सिताराम चौगुले (वय ६०, रा. मुरादपूर वरचीवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) यांची हिस्सा नं ८२/९ ही मालकीच्या जागा आहे. या जागेतील २० खैराची झाडे संशयित पर्शराम चौगुले यांनी तोडून ठेवलेली होती. ही जागा संशयिताने आपल्या मालकीची असे सांगत होता. या जागेची सरकारी मोजणी झाल्यानंतर तोडलेली झाडे कोणाची आहेत. याचा मालकी हक्क सिद्ध झाल्यानंतर ती तोडलेली खैराची झाडे त्यानेच घवून जायचे असे ठरलेले असताना देखील संशयिताने जमिनीची मोजणी होण्याचे पुर्वीच फिर्यादी बळीराम चौगुले यांच्याकडे विचारणा न करताच ३ लाख ६० हजाराची झाडे चोरुन नेली. या प्रकरणी बळीराम चौगुले यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.