२५ एकर जमीन विक्रीच्या फसवणूक प्रकरणात वकील नलावडे याला अंतरिम जामीन

रत्नागिरी:- २५ एकर जमीन २२ लाख ७५ हजार रुपये किंमतीला विक्रीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी ऍड. महेश नलावडे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवले आहे.

१० लाखांची रक्कम व्याजाने देऊन त्याबदल्यात सावकार निलेश कीर याने २५ एकर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. जमीन नावावर झाल्यानंतर कीर याला ही जमीन नको झाली. मला दिलेली मुद्दल आणि त्याचे व्याज हवंय, असे मध्यस्थी असलेल्या संदीप वेलोंडे या जिल्हा परिषद कर्मचार्‍याकडे मागणी केली होती. सतत त्याला त्रास दिला जात होता. अखेरीस वेलोंडे यांनी ती जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
२२ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम मला हवीय, असे निलेश कीर याने सांगितले होते. त्यानुसार वेलोंडे यांनी आपल्या ओळखीतून ही रक्कम जमवली होती आणि ऍड. महेश नलावडे यांच्या कार्यालयात ती रक्कम त्यांच्यासमक्ष निलेश कीर याच्याकडे सुपूर्द केली होती. याचवेळी ऍड. नलावडे यांनी २५ एकर जमीनीचे खरेदीखत तयार करून त्यावर संदीप वेलोंडे आणि निलेश कीर यांच्या सह्या घेतल्या. मात्र रजिस्टर कार्यालयात त्याची कोणतीही नोंद झाली नव्हती. निलेश कीर रक्कम घेऊन पसार झाला होता तर काही दिवसांनी खरेदीदार यांच्या परवानगीशिवाय ऍड. महेश नलावडे यांनी खरेदीखताची कागदपत्रे सावकार निलेश कीर याला दिली होती.
वकील आणि निलेश कीर या दोघांनी मिळून आपली फसवणूक केली, म्हणून संदीप वेलोंडे यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी निलेश कीर आणि ऍड. महेश नलावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच ऍड. महेश नलावडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने ऍड. महेश नलावडे यांना अंतरिम जामीन दिला आहे. मात्र या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागवले असून पोलिसांचे म्हणणे आल्यानंतर जामीन कायम करायचा की रद्द करायचा हा निर्णय न्यायालयात होणार आहे.