Monday, July 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून रत्नागिरीत अत्याचार

१७ वर्षीय मुलीचे अपहरण करून रत्नागिरीत अत्याचार

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी:- उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन रत्नागिरी येथे तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींविरुद्ध बीएनएस आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पीडित मुलीने १८ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी पहाटे एक ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. १४ जुलै रोजी दुपारी मुख्य आरोपी कृष्णा अच्युत फड (वय १८) याने पीडित मुलीला भेटून रात्री एक वाजता महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून बोलावले होते. ठरल्याप्रमाणे १५ जुलै रोजी पहाटे मुलगी आरोपीला भेटण्यासाठी गेली असता, कृष्णा फड याने तिला मोटारसायकलवरून रेल्वे फाट्याजवळ नेले. तिथे आधीच कार घेऊन थांबलेल्या गणेश बसुराज फड (वय २०) याने दोघांनाही कारमध्ये बसवून घेतले. प्रवासादरम्यान मुलीने विरोध दर्शवला असता, तिला गप्प बसवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तिला रत्नागिरी येथे नेले आणि तिथे मुख्य आरोपी कृष्णा फड याने पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आले होते, मात्र १८ जुलै रोजी पीडितेचा शोध लागल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबानंतर पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढ केली असून, गुरनं ४८७/२०२६ नुसार कलम १३७(२), ६४(२), ३(५) बीएनएस आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.