रत्नागिरी:- दसर्याच्या शुभमुहुर्तावर झालेल्या वाहन खरेदीने कोरोनाच्या संकटाची झळ मागे सारल्याचे चित्र उभे केले आहे. गेल्या चार ते सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 612 वाहने खरेदी करून अनेकांनी आपला दसर्याचा आनंद द्विगुणित केला. वाहन खरेदीत सुमारे 8 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.ही खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत दीडपट आणि अर्थचक्राला गती देणारी आहे. आरटीओ कार्यालयाला यातून सुमारे 70 लाख 86 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
दसर्याच्या मुहुर्तावर काही ना काही खरेदी करून आपल्या आनंदात भर टाकतो. सोने, नवीन वस्तू, गृहप्रवेश यादीबरोबर वाहन खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. आपल्या हक्काचे वाहन हे प्रत्येकाचे स्वप्न आहे.त्याला फायनान्स कंपन्या, बँका आदींची आर्थिक जोड मिळते. मात्र यंदाच्या दसर्यावर कोरोनाचे सावट होते. कुटुंबापुरता मर्यादित हा उत्सव झाला. गेली सात महिने अनेक बेरोजगार झाले, तर काही आर्थिक चणणीत आहेत. त्यामुळे यंदाच्या दसर्याला खरेदीला मार्यादा येतील असेच अनेकांचे मत होते.
मात्र दसर्याचा मुहुर्त साधुन जिल्ह्यात दसर्या दरम्यान 612 वाहनांची खरेदी झाली. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांचा समावेश आहे. वाहन खरेदीची ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, टॅक्स, रोड टॅक्स आदीच्या माध्यामातून आरटीओ कार्यालयाला दसर्यात 70 लाख 86 हजार 268 रुपयाचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी 446 वाहनांची खरेदी होऊन 55 लाखाच्या दरम्यान उत्पन्न मिळाले होते. कोरोनाचे संकट असतानाही यंदा मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात दसर्याच्या मुहुर्तावर 450 दुचाकी तर 120 चार चाकी आणि गुुडस् कॅरिअरच्या 42 वाहनांची विक्री झाली. यामध्ये रिक्षापासून, विविध कंपन्यांच्या पिकअप गाड्यांचाही समावेश आहे.