रत्नागिरी:- मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अपॉईंटमेंट घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागेल असे सांगून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार २७ मे ते सोमवार २९ मे या कालावधीत घडली आहे. याबाबत अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, फिर्यादी यांचा भाउ अब्दुलशकुर कासम खान यांची बायोप्सी टेस्ट मुंबई येथील सुलतान प्रधान हॉस्पिटल येथे करायची होती. त्यासाठी हॉस्पिटलची अपॉईंटमेंट घेण्यासाठी फिर्यादींच्या ओळखीचे मजगावकर यांनी गुगलवरुन सुलतान हॉस्पिटलचा मोबाईल नंबर फिर्यादी यांचा भाउ नौशाद यांना दिला. नौशाद यांनी अपॉईंटमेंट घेण्यासाठी त्या मोबाईलवर कॉल केला असता अपॉईंटमेंटसाठी ५ रुपये ऑनलाईन पेमेंट करावे लागतील असे बोलणाऱ्या संशयिताने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने पाठवलेल्या बुकिंग ॲपची लिंक ओपन करुन नौशाद यांनी त्यामध्ये पेशंटचे नाव व युपीआय नंबर टाकला होता.
त्यानंतर नौशाद आणि अब्दुल शकुर कासम खान हे मुंबईला सुलतान प्रधान हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांना अपॉईंटमेंट घेण्यात आली नसल्याचे समजले. त्यानंतर नौशाद यांनी आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट चेक केले असता त्यांना आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने १ लाख ८९ हजार ६ रुपये अज्ञाताच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे समजले. अपॉईंटमेंटच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.