हॉटेल्सना नियमबाह्य दिलेले सिलिंडर घेतले परत

रत्नागिरी:- व्यावसायिक सिलिंडरचे वितरण करु नये, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले असताना रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर देण्यात आल्याने खळबळ उडाली. अखेर वितरीत केलेले सिलिंडर परत आणण्याची मोहीम लगेचच हाती घेण्यात आली होती. याप्रकरणी एलपीजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या व्यवस्थापकांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता याप्रकरणी तपास केला जात आहे.

आखाती देशांमध्ये चाललेल्या युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून वितरक एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्या जात आहेत. शासनाकडून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी लक्षात घेता व्यावसायिक सिलिंडरचे वितरण करू नये, असे स्पष्ट आदेश वितरण एजन्सींना देण्यात आले आहेत. असे असतानाही काही हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलिंडरचे वितरण करण्यात आले. हा प्रकार समोर येताच काही हॉटेल व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

हॉटेल व्यावसायिकांकडून सिलिंडर वितरणाची मागणी होत होती. परंतु, शासनाचे आदेश डावलून वितरण झाल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाकडून कारवाईचे संकेत याप्रकरणी एलपीजी देण्यात आले. गॅसचे कंपनी वितरण करणाऱ्या व्यवस्थापकांकडून शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने जाऊन हॉटेल चालकांना दिलेले सिलिंडर परत घेत असल्याची माहिती आता समोर येत आहे.

व्यवस्थापन-कर्मचारी आमने सामने

गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांच्या मते, एजन्सी व्यवस्थापकाच्या सांगण्यावरूनच गॅस सिलिंडर वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही चूक नसताना कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असेल तर काम बंद केले जाईल. असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. दरम्यान याप्रकरणी आता पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून केला जात आहे.