रत्नागिरी:- हापूसच हंगाम जवळ येऊन ठेपला असून देवगडसह रत्नागिरीतून मुहूर्ताच्या पेट्या मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अहमदाबाद बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पहिल्या पेटीच्या खरेदीसाठी लिलाव केला जातो. प्रतिष्ठेसाठी ही पेटी दिग्गजांकडून खरेदी करताना सोन्याचा भाव केला जातो; पण जसजसा हंगाम सरकत जातो, तसा हा दर अळवावरच पाणी ठरतो. हापूस बाजारात आल्याचा सांगावा दिला जातो, एवढेच समाधान बागायतदारासह व्यावसायिकाला मिळते.
Pदेवगड हापूस सर्वात लवकर, त्यानंतर रत्नागिरी हापूस बाजारात दाखल होण्यास सुरु होतो. त्यापुर्वी पहिली पेटी बाजारात आणण्यासाठी बागायतदारांची चढाओढ सुरु असतेच. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी मुंबई, पुणे बाजारात चढ्या दराने विकल्याचे वृत्त येते. गेल्या तिन ते चार वर्षात सोशल मिडीयामुळे ते सर्वाधिक वेगाने पसरते. यंदाही त्याची प्रचिती आली आहे. देवगडची पहिली पेटी आली. स्वागताच्या पेटीचा लिलावही झाला. चार डझनच्या पेटीला पंचवीस हजार रुपये मिळाले. पुढे पुणे, कोल्हापूरतही अशाच प्रकारे पहिल्या पेटीचे स्वागत झाले. सुमारे एकावन्न हजार रुपयांना ती पेटी विकली गेली आहे. रत्नागिरी हापूसही बाजारात पाठवण्यात आला. पेटीला वीस हजार रुपये मिळाले. पुर्वी हा मान फक्त वाशी बाजार समितीला मिळत होता. हापूसचे जंगी स्वागत होते, मात्र हंगाम पुढे सरकत जातो, तसे त्याच्या किंमतीही घसरु लागतात. त्याची विविध कारणे असली तरीही हापूसचा दर स्थिर राहावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. हमीभाव मिळणार नाही, हे वास्तव स्वीकारत असल्याचे बागायतदार सांगतात. परंतु शेवटच्या टप्प्यात विकल्या जाणार्या हापूसला मिळणारा दर शेतकर्यांसाठी दिलासादायक नसतो हे निश्चित झाले आहे.