रत्नागिरी:- आवक वाढल्यामुळे वाशी बाजारातील हापूसच्या दरात होणारी घसरण थांबवण्यासाठी रत्नागिरीतील उत्पादकांनी दलालांशी समन्वय साधला. त्यात काही अंशी यश आले असून वाशीतील व्यावसायिकांनीही सध्याचे दर स्थिर ठेवले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात उत्पादन कमी असल्यामुळे दरावर नियंत्रण राहील अशी आशा निर्माण झाली आहे.
यंदा तुलनेत उत्पादन कमी असल्याने आंबा बागायतदारांना त्याचे नुकसान होते. या परिस्थितीत हापूसचे घसरणारे दर ही चिंतेची बाब आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वाशी येथे झालेल्या बैठकीत बाजार समितीमधील व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरीमधून जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, राजेंद्र कदम, जितेंद्र पाटील, प्रसन्न पेठे, बावाशेठ साळवी यांनी प्रश्न मांडले.
कोकणामधून वाशी बाजारात गतवर्षी 21 हजार पेटी जात होती. यंदा 40 हजाराहून अधिक पेटी येत आहे. त्यामध्ये 15 हजार पेटी ही रत्नागिरीतील असून उर्वरित सिंधुदुर्गसह अन्य जिल्ह्यातील आहे. आताचा दर पाच डझनच्या पेटीला 4000 रुपये दर आहे. कमीत कमी दर 1500 रुपये आहे. 15 एप्रिलनंतर उत्पादन कमी होणार हे निश्चित आहे. त्यावेळीही बाजारातील दर टिकणे आवश्यक आहे. अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक अडचणीत येईल. यामध्ये फळाच्या मोठ्या आकाराला दर अधिक पण छोट्या फळाला दर मिळत नाही. दरातील या तफावतीमुळे बागायतदार अडचणीत येत आहेत. पाच डझनपेक्षा सहा ते आठ डझनाचे दर प्रत्येकी पाचशे रुपयांनी कमी करतात. तो दर वाढवणे आवश्यक आहे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेतकर्यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर वाशीतील व्यावसायिकांनी चर्चा केली आणि त्याबाबत काही सुचनाही केल्या. यावर बाजार समितीचे संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे म्हणाले, ग्राहकांच्या मागणीवर दराची स्थिती अवलंबून राहते. तरीही जास्तीत जास्त दर स्थिर राहतील यादृष्टीने सर्वच व्यावसायिक प्रयत्न करतील. मोठया फळामध्ये साका निघतो त्यामुळे तो माल जास्तीत जास्त स्थानिक बाजारात विकला जातो तर छोटा निर्यातीला देतात. आंतरराष्ट्रीयस्तरावर आठवड्याला दर कमी-अधिक होतात. माल तिथे पोचपर्यंत दर बदललेले असतात. त्यामुळे निर्यातदारही भविष्याचा विचार करुनच वाशीतून माल उचलतो.









