हातिवले टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

राजापूर:- राजापुरातील हातिवले येथील टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनसे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्षांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.

या दोघांचीही एक दिवसाची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलीआहे. त्यामुळे या दोघानांही रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली आहे.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोट ठेवत टिका केल्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आता महामार्गावरिल टोल नाके व ठेकेदारांची कार्यालये लक्ष्य केली जात आहेत. गुरुवारी 17 रोजी राजापूर – हातिवले येतील टोल नाका मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडला होता. याप्रकरणी राजापूर पोलिसानी मनसे राजापूर तालुका अध्यक्ष पंकज सिताराम पंगेरकर व उपाध्यक्ष जयेंद्र विलास कोठारकर यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 427, 34 सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपल्याने त्यांना शनिवारी राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यानंतर त्यांना राजापूर पोलीसांनी रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.