हातखंबा येथे किरकोळ कारणावरुन प्रौढाला मारहाण, तिघांवर गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा बस स्टॉपच्या दरम्याने एका प्रौढाला तिघांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम कदम, मिलींद कदम, प्रभात कामेरकर (तिघेही रा. हातखंबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विलास रमाकांत बोंबले (41, रा. हातखंबा तिठा) यांनी पोलीस स्थानकात दिली. ही घटना 27 जून रोजी रात्री 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास बोंबले हे पाऊस आल्याने हातखंबा पिकअप शेडजवळ थांबले होते. परशुराम, मिलींद, प्रभात या तिघांनी तेथे येऊन शिवीगाळ व धमकी दिली. परशुराम कदम याने लोखंडी धातूची टोकदार वस्तू बोंबले यांच्या मानेवर घुसवण्याचा प्रयत्न करत असताना बोंबले यांनी दुसरीकडे मान वळवली. त्याचवेळी टोकदार धातूचे टोक उजव्या बाजूने गळयाच्या वरच्या बाजूला लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर तिघांनीही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

बोंबले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परशुराम कदम, मिलींद कदम, प्रभात कामेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.