हातखंबा पोलीस मदत केंद्रानजिक एसटी-कारची समोरासमोर धडक 

रत्नागिरी:-मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा पोलीस मदत केंद्राच्या जवळील उतारावर एस. टी. बस व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कारमधील दोघे जखमी झाले.

अपघातातील बस गणपतीपुळेहून इस्लामपूरच्या दिशेने चालली होती. याचवेळी कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने स्विफ्ट कार ( एमएच ०३ ए एम ०६१३ ) चालली होती. हातखंबा येथील पोलिस मदत केंद्राजवळील उतारावर सकाळी दहाच्या दरम्यान भरधाव वेगाने चाललेल्या कारने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. धडकेमध्ये कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली.

 या अपघातात ललिता रामदास माहुरे (वय ८२) व किरण रवी माहुरे (४५ . दोघे रा . अमरावती) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांना रुग्णवाहिकेने तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्याने या जखमींवर उपचार त्वरित करता आले. एस टी बस इस्लामपूर डोपोची आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हातखंबा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन वाहतूक पूर्ववत केली. कारमध्ये अडकलेल्या जखमींना स्थानिकांनी तातडीने बाहेर काढले.