हातखंबा तेथे ट्रकची ट्रकला धडक; क्लिनरचा मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा आरटीओ चेकपोस्ट समोर बेदरकारपणे ट्रक चालवून पुढील ट्रकला धडक देत अपघात केला. यात आपल्या ट्रकमधील क्लिनरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 9 जून रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली.

सुभाष महादेव पाटील (45,रा.मंगळवेढा, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या अपघातात त्याच्या सोबत असलेला क्लिनर परमेश्वर उर्फ पप्पू सत्याप्पा काळोखे(36,रा.मंगळवेढा, सोलापूर ) याचा मृत्यू झाला. बुधवारी सुभाष पाटील आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-13-एएक्स-3463) मधून सिमेंट बॅगा घेऊन परमेश्वर काळोखे सोबत सोलापूर ते जयगड असा येत होता. तो हाथखंबा आरटीओ चेकपोस्ट समोर आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला.आणि त्याने पुढील अज्ञात ट्रकला पाठीमागून धडक दिली.यात परमेश्वर काळोखेला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.याबाबत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.