रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा कदमवाडी येथे दिवसा दोन घरफोडीच्या घटना घडून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
ही घटना दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी संजय शिवराम कदम (वय ४१, रा. हातखंबा, कदमवाडी) यांच्या घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर फोडून त्यातून ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील जोड चैनसह, २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि १ लाख ३५ हजार रुपये रोकड असा एकूण २ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला.
याच वेळेत हातखंबा तारवेवाडी येथील रमेश रत्न तारखे यांच्या घराचेही कुलूप तोडून कपाटातील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.नं. १७७/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५, ३३१(३) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.