Tuesday, July 7, 2026
spot_img
Home चिपळूण हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही: ना. उदय सामंत

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक घेतली.
या बैठकीला नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई तहसीलदार प्रविण लोकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, गेल्या चार दिवसांत प्रचंड पाऊस झाला असून, १०० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट गाठले आहे. पूर परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही स्तरावर कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, संपूर्ण शासकीय यंत्रणा २४ तास सज्ज असली पाहिजे.

कशेडी घाट बोगद्याच्या आतमध्ये कोणतीही दरड कोसळलेली नाही, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. पावसामुळे रस्त्यापासून २०० मीटर वर असणारा डोंगर दगडांपासून सुटलाय आणि घसरून रस्त्यावर आला आहे. हा डोंगर घरांवर सरकण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिसराचा भूतज्ज्ञांकडून अभ्यास करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूणमधील वाशिष्ठी, खेडमधील जगबुडी आणि संगमेश्वरमधील शास्त्री नद्यांमधील गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. या गाळ काढण्याचा पूर नियंत्रणात प्रत्यक्ष किती फायदा झाला, याबद्दल स्थानिक नागरिकांकडूनच खरी माहिती व प्रतिक्रिया घेतली जाईल, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.

संभाव्य परिस्थितीचा सामना करताना नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवकांनी स्वतः भागात सक्रिय राहून नागरिकांमध्ये सतर्कता आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रांतांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेवून तिला सतर्क ठेवावे. कठडे नसलेल्या विहिरी पावसाच्या पाण्यामुळे भरल्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याची उपाययोजना करावी. असे निर्देश दिले.

“सध्या उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण जिल्हा व तालुका प्रशासन सतर्क आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रशासनाला स्थानिक नागरिकांचेही खंबीर पाठबळ आणि सहकार्य हवं आणि रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
– डॉ. उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी