रत्नागिरी:- जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या हर घर नल से जल मधून रत्नागिरी तालुक्यातील चौदा गावातील प्रत्येक घरात पाणी पोचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यातील २०१ एकुण महसुली गावांपैकी १९६ महसूल गावांचा समावेश केला असून त्याकरिता १२९.३२ कोटीची तरतूद आराखड्यात करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत जल जीवन मिशनमधून वैयक्तिक नळजोडण्या देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण होऊ लागली आहेत. यामधून प्रत्येक घराला ५५ लीटर पाणी दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच गावातील प्रत्येक घरात शंभर टक्के पाणी पोचले आहे. त्यामध्ये नांदीवडे ३५ कुटूंबे, गडनरळ-वैद्यलावगण ३४ कुटूंबे, ठिकाणसोमणे ३, ठिकाण चक्रदेव १, पिरंदवणे-वाडाजून ४० यांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात जयगड ५७६, चिंद्रवली-कोंडवी ८८, नवेट १८७, पाली मराठवाडी १२९, हातखंबा-डांगेवाडी १३०, मिरजोळे ठिकाण दाते १२ ही गावे जाहीर होणार आहेत. तसेच गोळप वायंगणी १७६, नांदीवडे कुणबीवाडी ९०, गणपतीपुळे ३०१ येत्या काही दिवसात जाहीर होतील. तेथील पाणी योजनेची कामे पूर्ण झालेली आहेत.









