हर्णे बंदरात बोटीवरील तांडेलचा समुद्रात बुडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील हर्णे बंदर येथे बोटीवर तांडेल म्हणून काम करणाऱ्या एका ४६ वर्षीय खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. महेश जनार्दन पाटील (रा. खारपाडा माहीम, जि. पालघर) असे मृताचे नाव असून, त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी हर्णे किनारी तरंगताना आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेश पाटील हे हर्णे येथील मोरेश्वर कानू चोगले यांच्या बोटीवर तांडेल म्हणून काम करत होते. रविवारी (१८ जानेवारी) बोटीचे कलरकाम पूर्ण झाल्यानंतर बोट समुद्रात नेऊन उभी करण्यात आली होती. त्यानंतर बोटीचे मालक घरी गेले होते.

रात्री ११ ते १ च्या सुमारास बोटीवरील दुसरे तांडेल दिनेश अनिल धोपावकर यांनी बोट मालकांना फोन करून माहिती दिली की, महेश पाटील हे दारूच्या नशेत बोटीवर आले होते, मात्र आता ते बोटीवर दिसत नाहीत. या माहितीनंतर बोट मालकांनी तातडीने हर्णे बंदर गाठले आणि रात्रभर त्यांचा शोध घेतला, परंतु अंधारामुळे काहीच थांगपत्ता लागला नाही.

दुसऱ्या दिवशी, सोमवार १९ जानेवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास शोध घेत असताना, महेश पाटील यांचा मृतदेह हर्णे बंदराजवळील समुद्राच्या पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यांना तातडीने बाहेर काढून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

​या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश पाटील यांना दारूचे व्यसन होते आणि त्या नशेतच त्यांचा पाय घसरून ते समुद्रात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.