हयातनगर येथे घरफोडी; ८२ हजाराचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहर व ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु झाल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात भुरट्या चोरीचे प्रकार तसेच घरफोडीचे प्रकार घडल्याचा घटना सुरुच आहे. नुकतेच शहरातील हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडला असून ८२ हजाराचा मुद्देमाल पळविला. शहर पोलिस ठाण्यात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) ते शनिवारी (ता. १५) ला सकाळी हयातनगर येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हयातनगर हाऊसिंग सोसायटी मधील फ्लॅट न ३०३ चा पुढील लाकडी दरवाजाला लावलेले कुलुप काढून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लाकडी बेडमध्ये ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, १६ हजाराचे कानातील जोड, १२ हजाराची चेन असा ८२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी सफुरा जाविद डांगे (४३) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहे. अलिकडे ग्रामीण व शहरी भागात भुरट्या चोऱ्यांना सुरवात झाली आहे. ग्रामीण भागातील मंदिरातील दानपेट्या, सोसायटी मधील फ्लॅट, बंद घरे ही चोरट्याने लक्ष केल्याचे चित्र आहे. ज्या-ज्या ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत त्या ठिकाणचे चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या चोरीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी नागरिक व ग्रामस्थांकडून पोलिसांकडे मागणी करण्यात येत आहे.