हंगामात पहिल्यांदा हापूस, केशर आंबा युरोपीय बाजारात

रत्नागिरी:-  यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मँगोनेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागेंची नोंदणी झाली असून देशात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. यामुळे निश्चितच देशातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात ही महाराष्ट्र राज्यातून होणार आहे.

भारतातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात होत असून जे शेतकरी निर्यातक्षम आंबा उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागांची आणि शेतीची नोंदणी मँगोनेट प्रणालीव्‍दारे करून घेतली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार देशात एकूण २३ हजार १५७ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी केली आहे. पण त्यातील १७ हजार ६९१ शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी ७६ टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील ६ हजार ९९६ शेतकरी हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

राज्यात रत्नागिरी जिल्हा अव्वल
राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागा नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून येथील ६ हजार ९९६ बागा नोंद झाल्या आहेत. तर बीड जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे २२ बागा नोंद झाल्या आहेत.