रत्नागिरी:- चारचाकी मधील सामान रूममध्ये घेऊन जात असताना हँडबॅग पार्किंग मधील उभ्या दुचाकीला लावली आणि इथेच घात झाला. अवघ्या दोन मिनिटात चोरट्याने डाव साधत हँडबॅग लांबवली. या बॅग मधील दोन लाखांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला.
या चोरी प्रकरणी प्रियांका सुजित हडकर (27, आरोग्य मंदिर) यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. चोरीची ही घटना 12 सप्टेंबर रोजी शंखेश्वर नगर फेज – 2 आरोग्य मंदिर येथे घडली.
12 सप्टेंबर रोजी फिर्यादी प्रियांका हडकर व तिचे पती हे गणेशोत्सव सण साजरा करुन चारचाकी गाडीने फिर्यादी प्रियांका हडकर यांचे वडील नरेंद्र भिकाजी देसाई यांच्या आरोग्य मंदिर येथे रूमवर आले. आरोग्य मंदिर येथील शंखेश्वर नगर फेज – 2 येथील बिल्डिंगचे पार्किंगमध्ये चारचाकी गाडी लावून सामान बाहेर काढून सर्व सामानाच्या बॅगा रुममध्ये घेवून जात असताना फिर्यादी यांच्याकडे जास्त सामान असल्याने त्यांनी स्वत:ची हॅण्डबॅग पार्किंगमध्ये लावून ठेवलेल्या दुचाकीवर ठेवली. इतर सामान रुमवर नेवून ठेवून स्वत ₹:ची हॅण्डबॅग घेण्यासाठी परत आल्या. यावेळी त्यांना त्यांची हॅण्डबॅग त्याठिकाणी मिळुन आलेली नाही. फिर्यादी यांनी इतरत्र शोध घेवून तसेच घरातील माणसांनी ती हॅण्डबॅग रुममध्ये न आणल्याचे सांगितल्याने सदरची हॅण्डबॅग कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हॅन्डबॅग मधील 2 लाख 5 हजार किमतीचे मंगळसूत्र आणि 2 हजार रोख चोरट्याने चोरून नेले.