दोघा राज्यस्थानी तरुणांना अटक
रत्नागिरी:- जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकौंट तयार करून फर्निचर स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून तीन लाख ३१ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिनेश कुमार मीना, राकेश कुमार मीना (दोघेही रा. मांगीलाल, गाव भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगड, राज्यस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संशयितांविरुद्ध रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहाराबाबत बँकाकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सायबर पोलिस पथक राजस्थान येथे पाठवून संशयितांचे कोणत्याही प्रकारचे मोबाईल लोकेशन प्राप्त नसताना स्थानिक बातमीदार तयार करून त्या आधारे संशयितांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस हवालदार रामचंद्र वडार, विनोद कदम, पोलिस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांची टीम राजस्थान येथे जाऊन संशयितांच्या मुसक्या आवळल्या.