सौंदळ बाजारपेठेत जोरदार हाणामारी; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

‘लांजामध्ये ये, तुला दाखवतो’, अशी दिली होती धमकी

राजापूर:- सौंदळ बाजारपेठेत १८ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अब्दुल्ला इरफान नाईक (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींमध्ये एका ५० वर्षीय महिलेसह फैयाज लांजेकर (२८), मुख्तार लांजेकर (२१) आणि एक विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. सर्व आरोपी सौंदळमधील मुस्लिमवाडीचे रहिवासी आहेत.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, बशर शेख आणि त्यांची पत्नी सौंदळ बाजारात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी मासे विक्रीचा व्यवसाय करणारे मुख्तार लांजेकर, फैयाज लांजेकर, विधिसंघर्षित बालक आणि त्याची आई यांनी लोखंडी सळईने बशर शेख यांना पाठीवर आणि कमरेवर मारहाण करून दुखापत केली. तसेच, भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या एका महिला साक्षीदाराला आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी केली. याव्यतिरिक्त, याच विधिसंघर्षित बालकाने सकाळी ७:३० वाजता फिर्यादी अब्दुल्ला नाईक यांना धमकी दिली होती आणि ‘लांजामध्ये ये, तुला दाखवतो,’ असे बोलून शिवीगाळ केली होती, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या मारहाणीत जखमी झालेले बशर शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.