रत्नागिरी:- सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबाबत राजापूर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजापूर तालुक्यात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करुन त्याद्वारे महापुरुषांचा अवमान केला.
जनमानसात एकोपा टिकण्यास बाधक असे कृत्य केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. ती मिळताच त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी काल (दि. ७ जून) सायंकाळी सव्वासात वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास राजापूरचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करत आहेत.
दरम्यान, कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत, फॉर्वर्ड करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कृत्यांवर रत्नागिरी पोलीस दलाचे सायबर पोलीस ठाणे आणि सोशल मीडिया सेलची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणी जाणीवपूर्वक असे कृत्य करीत असल्यास सायबर पोलीस ठाण्याचा मोबाइल क्रमांक ८८३०४०४६५० आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन क्रमांक (०२३५२) २२२२२२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.