रत्नागिरी:- ट्रक थांबवून गाडीतील मालाचा मार्केट सेस भरण्यास सांगितल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करून वाहतूक पोलिसाला लाकडी काठीने मारहाण केल्याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गणप्पा श्रीनिवास (वय ५६, रा. आंध्र प्रदेश) व चालक कोटेश्वरराव व्यकटेशराव मादिवाडा (वय ५७, रा. पेढा, जि. क्रिष्णा, राज्य आंध्र प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.
ही घटना बुधवारी (ता. २६) सकाळी सव्वासातच्या सुमारास शहरातील चर्मालय चाररस्ता येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासोबत पंकज प्रभाकर मयेकर कुवारबाव तपासणी नाका येथे कर्तव्यावर हजर होते. बुधवारी सकाळी सव्वासात वाजता दहाचाकी ट्रक (एपी १६ टीके ११२२) हातखंबा दिशेने रत्नागिरीकडे येत असताना फिर्यादींनी हात दाखवून व शिट्टी वाजवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक निघून गेला. फिर्यादी व पंकज मयेकर यांनी चर्मालय येथे चाररस्ता नाक्यावर चालकाला थांबवले व मालाचा मार्केट सेस भरण्यास सांगितले असता संशयित गणप्पा श्रीनिवास याने कामात अडथळा आणून शिवीगाळ करून ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली. तसेच लाकडी काठीने फिर्यादी यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारहाण करून निघून गेला. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.