Wednesday, May 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सुरज झोरे खून प्रकरणात ‘त्या’ तरुणीची पोलिसांकडून चौकशी

सुरज झोरे खून प्रकरणात ‘त्या’ तरुणीची पोलिसांकडून चौकशी

रत्नागिरी:- गेल्या सहा दिवसांपूर्वी कुवारबाव – साईनगर येथील सुरज राजाराम झाेरे (वय २५) या तरुणाच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेली तरुणी रत्नागिरीत दाखल झाली. पाेलिसांनी तिला मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला.

सुरज झाेरे याच्या खूनप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिसांनी मुख्य संशयित आराेपी सोहम एकनाथ म्हात्रे (वय. १८, रा. शांतीनगर – रसाळवाडी, रत्नागिरी), अभिषेक देवानंद राठोड (वय. २२, रा. आदिनाथ नगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (वय. २१, रा. शांतीनगर – रसाळवाडी, रत्नागिरी) या तिघांना अटक केली आहे. त्यांना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित सोहम म्हात्रे याचे सुरज झोरे याच्याशी एक वर्षापूर्वी आर्थिक व्यवहारातून भांडण झाले होते. त्यानंतर सुरेश हा सोहम म्हात्रे आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत हाेता. तसेच सुरेश हा सोहमच्या मैत्रिणीला सोहम विरोधात सतत भडकवत होता. ही सर्व खदखद मनात ठेवून सोहमने सुरेशचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने गुरुवारी रात्री सुरेशला कुवारबाव-साईनगर येथील सात बंगलाच्या मागे बोलावून घेतले होते. सुरज त्याठिकाणी आला असता सोहमने आपल्या सोबत आणलेल्या कोयत्याने सुरजवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

सुरजला रक्ताच्या थारोळ्यात टाकून तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गंभीर जखमी सुरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मृत्यूपूर्वी सुरजने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिघांनाही रात्रीच अटक केली हाेती. मात्र, या घटनेवेळी हजर असलेली साेहमची मैत्रीण तिथून फरार झाली हाेती.

पाेलिसांनी तिचा शाेध घेतला असता ती मुंबईत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी तिला रत्नागिरीत येण्यासाठी समन्स बजावले हाेते. त्यानुसार ती मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली. त्यानंतर पाेलिसांनी तिला घटनास्थळी नेऊन त्याठिकाणी पंचनामा केला.