शहरात 12 ठिकाणी राहणार सीसीटीव्ही वॉच
रत्नागिरी:- स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी पालिकेकडून कसून प्रयत्न सुरु आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे; मात्र काही अतातायी नागरिक गाडी गेल्यानंतर मोकळ्या जागेवर कचरा फेकुन देतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरात 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने घेतला असून त्याची निविदाही काढली आहे.
रत्नागिरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य बाजारपेठेसह परिसरामध्ये छोटी-मोठी दुकानेही आहेत. मारुतीमंदिरसह पुढील भागात लोकवस्ती वाढत असल्याने तिथेही नवीन बाजारपेठा भरतात. प्रतिदिन शहरात काही टन कचरा गोळा केला जातो. कचरा साचून शहर बकाल होऊ नये यासाठी पालिकेने घंटागाडी सुरु केली आहे. प्रत्येक वसाहतीमधून कचरा गोळा करुन तो घंटागाडीत दिला जातो. बाजारपेठांमधील व्यावसायिकांसाठी रात्री गाडी सुरु करण्यात आली आहे. तरीही अनेक नागरिकांकडून कचरा मोकळ्या टाकण्यात येत आहे. या जागांवर भटकी कुत्री, भटकी जनावरे वास्तव्य करतात. अन्न मिळत असल्यामुळे ती मोकाटपणे शहरभर फिरतात. यामधून शहरवासीयांची सुटका करण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कडक पावले उचलली जात आहेत. घंटागाडी निघुन गेल्यानंतर मोकळ्या जागे कचरा टाकणार्यांवर चाप लावण्यासाठी पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील 12 जागा निश्चित केलेल्या आहेत. त्यात पर्याची आळी, पटवर्धन हायस्कुलकडे जाणार्या गल्लीत लॉज समोर, झारणी रोड, आठवडा बाजार शौचालयाच्या मागे, मिरकरवाडा पोलीस चौकी, नवीन भाजी मार्केट, कोकणनगर स्वामी समर्थ बंगल्यासमोर, मजगाव शिवाजीनगर स्मशान भुमीसमोर, शिवाडी क्रीडांगणा मागील भाजी मार्केट समोर, कोकणनगर कदमवाडी समोर, शिवाजी क्रीडांगण मच्छीमार्केटमध्ये, झारणी रोड मच्छीमार्केट मधील जागांचा समावेश आहे. हे कॅमेरे लावण्यासाठीची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. पुढील महिन्याभरात ठेकेदार निश्चित करुन त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.









