सीसीटिव्हीने झाला खुनाचा उलगडा; आधी हातांनी नंतर रस्सीने गळा आवळून केला खून 

रत्नागिरी:- रत्नागिरी बाजारातून बेपत्ता झालेले मुंबईतील सोने – चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी (५५,रा.भाईंदर मुंबई) यांचा हातांनी आणि रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे रत्नागिरीतील एका सोने-चांदी व्यापार्‍यासह अन्य दोन संशयितांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भूषण सुभाष खेडेकर (४२,रा. खालची आळी, रत्नागिरी), महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा.मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी) आणि फरीद महामुद होडेकर (३६, रा.भाट्ये, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. किर्तीकुमार कोठारी हे मुंबई येथून व्यवसायिक कामासाठी रविवार १८ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील श्रध्दा लॉजमध्ये उतरले होते. सोमवारी आपल्या व्यवहाराचे कामकाज केल्यानंतर रात्री ते गोखले नाका ते रामआळी असे जात असताना त्यांना कोणाचातरी फोन आल्याने ते परत मागे फिरुन गोखले नाका येथून आगाशे कन्याशाळेजवळ चालत गेल्याचे सीसीटिव्ही फूटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर येथून ते बेपत्ता झाले होते.

दरम्यान, त्यांचा मुलगा करण किर्तीकुमार कोठारी याने वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.म्हणून करणने नातेवाईकांसह रत्नागिरीत येउन वडिल ज्या लॉजमध्ये उतरले होते तिथे आणि वडिलांच्या संपर्कातील ज्वेलर्सकडून माहिती व चौकशी करुन शहर पोलिस ठाण्यात खबर दिली  होती.पोलिसांनी किर्तीकुमार यांचा तपास करताना शहरातील सीसीटिव्ही फूटेज पाहिले असता त्यांना सोमवारी रात्री ८.२४ वा.सुमारास किर्तीकुमार हे आगाशे कन्या शाळेसमोरील त्रिमुर्ती ज्वेलर्समध्ये जाताना दिसून आले परंतू ते दुकानातून पुन्हा बाहेर येताना दिसले नाहीत.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दुकान मालक भूषण खेडेकरसह या गुन्ह्यात त्याला मदत करणार्‍या अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांची चौकशी केली.पोलिसांनी आपला खाक्या दाखताच भूषणने मी महेश आणि फरीद या दोघांच्या मदतीने किर्तीकुमार कोठारी यांना आधी हातांनी आणि नंतर रस्सीने गळा दाबून ठार मारल्याचे कबुल केलेे.त्यानंतर संशयितांनी किर्तीकुमार यांचा मृतदेह दुकानातच गोणत्यात भरुन दुकानाबाहेर उभ्या केलेल्या रिक्षातून अबलोली येथील जंगलमय भागात नेउन टाकल्याचे कबुल केले.