सीआरएस तपासणीनंतर महिन्याभरात कोरे विजेवर धावणार 

व्यवस्थापकिय संचालक संजय गुप्ता यांची माहिती 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे बहूतांश काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीआरएस) तपासणी झाल्यानंतर महिन्याभरात या मार्गावरील गाड्या वीजेवर चालतील, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकिय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.

बुधवारी (ता. 10) सायंकाळी अनौपचारीक गप्पा मारताना पत्रकारांनी माहिती दिली. ते म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासह दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. विजेवर इंजिन चालवण्याची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली आहे. सीआरएसची चाचणी झाली की रत्नागिरी ते रोहा या भागात विजेवर गाड्या चालवण्यात येतील. सुरवातील माल वाहतूक करणार्‍या गाड्या चालवून पाहीले जाईल. त्यानंतर प्रवासी वाहतूकीला सुरवात केली जाईल. यासाठी लागणारी विज महावितरणच्या ग्रीडमधून घेण्यात येणार आहे. संबंधितांशी करारही झालेला आहे. साधारणपणे 70 मेगावॉट वीज महिन्याला लागेल असा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरीतून पुढे वेर्णापर्यंतचे सुमारे 200 किलोमीटरहून अधिकचे काम पूर्ण होण्यासाठी जुन महिना उजाडेल. विजेवर चालणारी इंजिनही येथे उपलब्ध ठेवण्यात आलेली आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांच्या तिकिटांचे दरासह नवीन गाडी सुरु करण्याचे निर्णय हे केंद्रस्तरावर होत असतात. रेल्वे मंत्रालयाकडून सुचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करण्यासाठी अजुनही आदेश प्राप्त झालेले नाहीत. लोकल गाड्या अन्य रेल्वे मार्गावर सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेसाठीही सुचना येतील. रत्नागिरी रेल्वेस्थानकत प्रवाशांना येणार्‍या अडचणी सोडविल्या जातील असे आश्‍वासन गुप्ता यांनी दिले. कोरोना कालावधीत जास्तीत जास्त लोकांना सुरक्षितरित्या प्रवासासाठी कोकण रेल्वेने सुविधा दिल्या आहेत. प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. मार्च अखेरीस त्याचा ताळेबंद उपलब्ध करुन दिला जाईल असे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वे मार्गावर काही महिन्यांपुर्वी चिपळूण ते खेड दरम्यान धावत्या रो-रोमधून एक ट्रक खाली पडला होता. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. गाडीवर उभ्या केलेल्या त्या ट्रकची प्लेट तुटल्यामुळे हा प्रकार घडला. तो वरुन ट्रेनच्या एका बाजूला अडकला आणि फरफटत गेला. यामध्ये एका बोगीसह ट्रकचेही मोठे नुकसान झाले, अशी माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.

कोकण रेेल्वेचा महत्त्वाकांक्षी जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम संबंधित कंपनीने बंद केल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकिय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. व्यावसायिक महत्त्व कमी झाल्यामुळे हे काम थांबवल्याचे त्यांनी सांगितले. सागरमाला प्रकल्पांतर्गत मालवाहतूकीसाठी बंदरे रेल्वे किंवा रस्ते मार्गाना जोडण्यात येणार होती. बंंदरातून येणार्‍या मालाची वाहतूक सुकर व्हावी यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जयगड-डिंगणी हा नवीन मार्ग अस्तित्वात येणार होता. चिपळूण ते कराड या प्रकल्पाची मदार केंद्र शासनावर अवलंबून असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.