सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला सळीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- ‘मी सिगारेट ओढत आहे’ असे बोलल्याच्या रागातून लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत व धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय माने (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) आणि सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (रा. कासारवेली, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत ही घटना रविवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास कासारवेली ते साखरतर जाणाऱ्या रस्त्यावर एका दवाखान्या समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गौरव संतोष शिंदे (वय ३२, रा. नार्वेकर कॉ्म्प्लेक्स बाजूला, गाडीतळ, रत्नागिरी) हे त्यांच्या सासुरवाडी कासारवेली येथे मेव्हणा भुषण शिरगांवकर यांचे घरी जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते सिगारेट ओढत उभे असताना संशयित अक्षय माने तेथे आला व फिर्यादी यांना तु बाजूला हो तु येथे का उभा आहेस असे बोलल्यावर फिर्यादी यांनी मी सिगारेट ओढत आहे असे सांगितले याचा राग मनात धरुन अक्षय यांने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर संशयित सिद्धार्थ लाकडे याने लोखंडी सळीने मारहाण करुन दुखापत केली व धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी गौरव शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.