सावर्डे:- अंगणात खेळत असलेल्या आपल्या 9 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याने घरी नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला असल्याची तक्रार मुलीच्या आईने सावर्डे पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून विनायक पेढाम्बकर या 52 वर्षीय प्रौढाला सावर्डे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई केली.
अत्यंत संताप आणणाऱ्या या घटनेमुळे सावर्डे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सावर्डे मधील एका कॉलनीमध्ये चार दिवसापूर्वी ही घटना घडली. मुलीचे आईवडील कामाला गेल्याची संधी साधून या नराधमाने छोट्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि आपले कुकर्म साधले..कुणाला काही न सांगण्याची तिला धमकीही दिली. आपल्या मुलीला त्रास होत असल्यानचे मुलीच्या आईला समजल्यानंतर तीने तीची विचारपूस केली आणि मुलीने धक्कादायक प्रकार आईला सांगितला. आईने तात्काळ सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विनायक पेढाम्बकर याच्या विरोधात तक्रार दिली. सावर्डे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तात्काळ हालचाल करून आरोपीला गजाआड केले. आरोपीवर 376, 642, 652 नुसार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान सदर घटनेमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची अफवा पसरल्याने दुर्गा शक्तीच्या अश्विनी भुस्कुटे, अशोक भुस्कुटे, श्रद्धा कदम, पत्रकार राजेंद्रकुमार शिंदे आणि पत्रकार शाहिद खेरटकर यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली असता गुन्हा दाखल होऊन आरोपीला गजाआड करून तपास चालू असल्याची माहिती उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.