सावर्डे नांदगाव येथे डोक्यात सिलेंडर मारुन वृद्ध महिलेचा खून

रत्नागिरी:- सावर्डे-नांदगाव येथे ६० वर्षीय महिलेच्या हत्येच्या घटनेने चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर दहीहंडीच्या उत्सवानिमित्त महिलेचा पती आणि वाडीतील नागरिक बाहेर गेलेले असताना अज्ञात इसमाने महिलेच्या घरात प्रवेश करुन तिच्या डोक्यात सिलेंडर मारुन तिचे दागिने आणि पैसे लुटून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावर्डे-नांदगाव येथे महिलेची हत्या झाली आहे. याची खबर पंचक्रोशीत पसरल्यानंतर गावागावातून लोक नांदगावमध्ये आले. महिलेची हत्या झाल्याची पाहून सर्वांना धक्का बसला. सदर विवाहीता महिला सुनिता पर्शुराम पवार ही घरात एकटीच असताना एक किंवा दोन जणांनी घरात प्रवेश करुन तिचे तोंड दाबले असावे आणि त्यानंतर तिच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून तिला जागीच ठार केले असावे, अशी शक्यता प्राथमिक स्वरुपात समोर येत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती दहीहंडी उत्सवासाठी घराबाहेर गेला असता महिला घरी एकटीच होती. तिचा आवाज देखील घराबाहेर आला नाही, असे शेजारी राहणार्‍या महिला सांगतात. म्हणजेच, पीडीत महिलेचे तोंड दाबले असावे अशी शक्यता आहे. रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. लवकरच याची माहिती उघड होईल.