सावर्डेत कात व्यावसायिकावर ईडीसह वनविभागाची कारवाई

खैराचा माल जप्त; चौकशी सुरूच

चिपळूण:- कात व्यावसायीक सचिन पाकळे यांच्या निवासस्थानी दोन दिवस ईडीची यंत्रणा ठाण मांडून चौकशी करत आहे. ही कार्यवाही सुरू असतानाच चिपळूण वनविभागाने देखील त्याचठिकाणी असलेल्या कात कारखान्याची शुक्रवारी तपासणी करून काही प्रमाणात खैराचा माल जप्त केला आहे. मात्र हा खैर कोठून आणला त्याची चौकशी सुरूच ठेवली आहे. एकाचवेळी दोन्ही यंत्रणेकडून उशीरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे आणि खेड तालुक्यातील सुकीवली येथे एकाचवेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी पहाटे छापेमारी केली. गुरूवारी दिवसभर सावर्डे येथील पाकळे यांच्या निवासस्थांनी ही यंत्रणा तळ ठोकून होती. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील उशीरापर्यंत ही चौकशी सुरू होती. अशातच ईडी च्या अधिकाऱ्यांनी पाकळे यांच्या निवासस्थानाच्या बाजूलाच असलेल्या कात कारखान्याकडे लक्ष वेधले. तेथे खैराचे लाकूड व अन्य सामुग्री आढळून आल्याने त्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान व अन्य दोन सहकाऱ्यांनी सावर्डे येथे धाव घेतली. पाकळे यांच्या घराच्या आवारातच आढळलेल्या खैराची नोंद घेण्यात आली. यातील काही खैर जप्त करण्याची प्रक्रीया वनविभागाकडून सुरू होती. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असून त्यानंतरच काही गोष्टी उघड होतील, अशी माहिती परिक्षेत्र वनअधिकारी खान यांनी दिली. काही महिन्यांपुर्वी गुजरात येथील खैर चिपळूणात विकल्याचा प्रकार उघड झाला होता. यातून लाकूड व्यवसायात मनी लॉ़ड्रींगचा संशय बळावला होता. मात्र आता थेट ईडी च्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याने पुन्हा एकदा याविषयीची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.

याविषयीची अधिकृत माहिती अजुनही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. तसेच उद्योजक सचिन पाकळे हेही चिपळूणात नसल्याने ते आल्यानंतरच यातील वस्तूस्थिती स्पष्ट होणार आहे.