साळवी स्टॉप येथे बंगला फोडून दहा तोळे सोने लंपास

रत्नागिरी:- कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरातील अनेक नागरिक बंगले, फ्लॅट बंद करुन गावाकडे जातात. याच संधीचा फायदा चोरटे घेतात. शहरात चोरट्यांनी पुन्हा डोक वर काढल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २३) शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथील पालकर कुटुंबिय मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेल्याच्या संधाची फायदा घेऊन त्यांच्या बंगल्याच्या मागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी १० तोळे सोने व २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी (ता. २७) उशिरापर्यत सुरु होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भारतनगर, साळवीस्टॉप येथे फिर्यादी फिरोज कुतबुद्दीन पालकर यांचा बंगला आहे. रविवारी दुपारी घरातील सर्व मंडळी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेले होते. शेजारी रहाणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी (ता. २५) त्यांना फोन करुन चोरट्यांनी बंगला फोडल्याची माहिती दुरध्वनीवरुन दिली. पालकर यांच्या बंगल्याचा मागचा दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने तोडून चोरट्याने प्रवेश केला. घरातील कपाटातील १० तोळे सोने व रोख रक्कम २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिरोज पालकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच शहर पोलिसाचे पथक तसेच डिवायएसपी निलेश माईणकर यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली अद्यापही तपास सुरु आहे. चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी सीसीटिव्ही लावावेत

शिमगोत्सवाच्या दिवसात घरफोडी च्या घटना नियमित घडतात. घर बंद करुन नागरिक गावाकडे जातात याच संधीचा फायदा घेऊन घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत असतात. आजची घटना ही सराईत गुन्हेगाराकडून झालेली असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी हॉऊसिंग सोसायटी तसेच बंगला आदी ठिकाणी सीसीटिव्ही लावून घ्यावेत असे आवाहन डिवायएसपी निलेश माईणकर यांनी केले आहे.