Friday, June 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी साळवी स्टॉप येथे तरुणावर सुरीने प्राणघातक हल्ला

साळवी स्टॉप येथे तरुणावर सुरीने प्राणघातक हल्ला

रत्नागिरी:- मुक्या प्राण्याला मारण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून एका तरुणावर सुरीने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्जुन रतन शिंदे (वय २३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. साळवी स्टॉप) हे १५ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास साळवी स्टॉप येथील नातेवाईक अमोल जगताप यांच्या घरासमोर बसले होते. दरम्यान, तेथे असलेल्या एका कुत्र्याला आरोपी विशाल विलास शिंदे (वय २५, रा. साळवी स्टॉप) याने लाथेने हाकलले, ज्यामुळे तो कुत्रा जोरात भुंकू लागला.

आरोपी विशाल पुन्हा त्या कुत्र्याला दगड मारून मारण्याचा प्रयत्न करत असताना, फिर्यादी अर्जुन यांनी त्याला, “त्या मुक्या प्राण्याला कशाला मारतोस? त्याने तुझे काय केले?” असे विचारून रोखले. याचा राग मनात धरून आरोपी विशालने फिर्यादींना आईवरून शिवीगाळ करत, “तुला मारीन” अशी धमकी दिली.

वाद इतक्यावरच थांबला नाही. संतापलेल्या आरोपीने घरात जाऊन धारदार सुरी आणली आणि फिर्यादी अर्जुन यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, आरोपीने त्यांना हातानेही मारहाण केली.

याप्रकरणी जखमी अर्जुन शिंदे यांनी तक्रार दिल्यानंतर, रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात आरोपी विशाल विलास शिंदे याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.