साळवी स्टॉप येथील हॉटेल गारवाच्या मालकाला बेदम मारहाण

रत्नागिरी:- साळवी स्टॉप येथील गारवा हॉटेलच्या मालकाला अज्ञात आरोपींकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हॉटेलजवळ आरडाओरड करत शिवीगाळ कशाला करता?, अशी विचारणा केली असता आरोपींनी हॉटेलच्या मालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींच्या मारहाणीत हॉटेलमालकाला गंभीर मार लागला. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा रत्नागिरीतील गारवा हॉटेलच्या बाहेर अज्ञात आरोपी गोंधळ घालत कुणालाही शिवीगाळ करत होते. त्यानंतर हॉटेलच्या मालकाने आरोपींना जाब विचारत तिथून जाण्याची विनंती केली. परंतु त्यावरून संतापलेल्या आरोपींनी चक्क हॉटेलच्या मालकावरच जीवघेणा हल्ला करायला सुरुवात केली. त्यानंतर हॉटेल मालकाने आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलबाहेरील लोक आत येत असल्याचं समजताच आरोपींनी घटनास्थळावर पळ काढला.

आरोपींनी दगड, काठ्या आणि हॉकी स्टिकने हॉटेल मालकाला मारहाण केली आहे. त्यामुळं पीडित तरुणाला पायावर, छातीवर आणि नाकावर गंभीर मार लागला आहे. त्यानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून कारवाई केली.