साळवी स्टॉप येथील घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया

रत्नागिरी:- शहराचे डंपिंग ग्राऊंड म्हणून वर्षानुवर्षे धुमसत असलेल्या घनकचऱ्याचा प्रश्न हळुहळु मार्गी लागत आहे. सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक मिटर साचलेल्या घनकचऱ्यावर बायो मायनिंग मशिनद्वारे प्रक्रिया करून त्याचे खत तयार करण्यात येत आहे. पालिकेचे माजी आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या प्रयत्नाने भिजत पडलेला हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्घंदी, धुर आदीची समस्या कायमची सुटणार आहे. पहिल्या टप्यात २८ लाख रुपये खर्च करून ४ हजार क्युबिक मिटर कचरा कमी करण्यात आला. तर उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडे ४४ लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

रत्नागिरी पालिककेने स्वच्छ भारत अभियानात देशात नाव केले असले तरी स्वतःच्या घनकचरा प्रकल्पाबाबत अजून पालिका उदासिन आहे.जागे अभावी पालिकेचा घनचकरा प्रकल्प आधिच रखडला आहे. अनेक वर्षे लढा देऊन दांडेआडोम याथील सुमारे ६ते ७ एकर जागेचा विषयन्यायालयात पालिकेच्या बाजूने लागला. त्यामुळे या जागेवर पालिकेचा हक्काचा अत्याधुनिक प्रकल्प होणार हे निश्चित होते. मात्र काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की तेथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे समजते. आता हक्काची जागा सोडून पालिका एमआडीसीतील जागेच्या मागे आहे. तसा प्रस्ताव दिला असला तरी अजून एमआयडीसीकडुन अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र या जंजाळात आडकुन न पडता आरोग्य सभापती निमेश नायर यांनी मंत्री उदय सामंत आणि उद्योजक भैय्या सामंत यांच्या मदतीने काही कंपनीशी त्यांनी चर्चा केली. या कंपन्यांनी मोठ-मोठ्या शहरामध्ये डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले होतो.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत त्यासाठी पहिल्या टप्प्यात २८ लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंडवर वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्यात ४ हजार क्युबिक मिटर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे.  बायो मायनिंग मशिनद्वारे त्याचे खत तयार करण्यात आले आहे. पालिका या खताची विक्री करत असून त्याला चांगली मागणी आहे. आता दुसऱ्या टप्यात उर्वरित १ लाख ५६ हजार क्युबिक मिटर घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. वर्षानुवर्षे हा कचरा साठुन राहिल्याने मिथेन गॅस तयार होऊन अतिउष्णतेमुळे हा कचला आपोआप पेट घेत होता. त्यामुळे या परिसरात धुराचे साम्राज्य पसरत होते. तसचे ओला कचरा कुजल्यामुळे त्याची प्रचंड दुर्घंदी पसरत होती. मात्र टप्या-टप्याने या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन हे डंपिंग ग्राउंडवरील कचरा नाहीसा होणार आहे.