Tuesday, May 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी साळवी स्टॉप परिसरातून ‘ब्रीझा’ कारची चोरी

साळवी स्टॉप परिसरातून ‘ब्रीझा’ कारची चोरी

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या मारुती सुझुकी कंपनीची ‘विटारा ब्रीझा’ कार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश श्रीपाद काटदरे (वय ५६, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांचा गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी, ३ मे रोजी दुपारी ४:४० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची विटारा ब्रीझा कार (क्र. एम.एच.०२ ईके २३०२) साळवी स्टॉप येथील जोशी मेडिकलसमोर उभी केली होती. अवघ्या काही वेळातच अज्ञात चोरट्याने फिर्यादीची कोणतीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने ही कार पळवून नेली.

चोरीला गेलेल्या या कारची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. साळवी स्टॉपसारख्या गजबजलेल्या भागात आणि ते ही दिवसा कार चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेश काटदरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा माग काढत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.