सार्वजनिक रस्ता अडविणाऱ्या १२ जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- निवळी-बौद्धवाडी येथे सार्वजनिक रस्त्यात चिरे व लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद करुन तरुणास कामावर जाण्यास अडविणाऱ्या १२ जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल रमेश सावंत, संदेश उर्फ संजू रघुनाथ सावंत, विवेक दिपक सावंत, जितेंद्र जयवंत सावंत, मनोहर सखाराम सावंत, मिलींद नथुराम सावंत, अनिकेत चंद्रकांत सावंत, साहील नरेश सावंत, वैभव नथुराम सावंत, निखिल संतोष सावंत, शौला हिराजी सावंत, प्रथमेश उर्फ चिग्या दिपक सावंत (सर्व रा. निवळी, बौद्धवाडी-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेआठच्या सुमारास संदेश उर्फ संजू सावंत यांच्या घरासमोर निवळी बौद्धवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजू सुरेश निवळकर (वय ३२, रा. निवळी बावनदी, रोहिदासवाडी, रत्नागिरी) हे मोटार (क्र. एमएच-०८ एएन६८५२) घेऊन पाली येथे जात असताना संशयित संदेश सावंत निवळी-बौद्धवाडी येथे आले असता बौद्धवाडीतील संशयित १२ जणांनी रस्त्यावर चिरे व लाकडी ओंडका आडवा टाकून रस्ता बंद करुन फिर्यादी यांना कामावर जाण्यास अडविले. या प्रकरणी राजू निवळकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.