खेड येथील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यात घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून मायलेकासह सुनेला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी खेड पोलिसांनी पुतण्यासह कुटुंबातील तीन महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या हिंसक हल्ल्यात फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) या आपल्या मुलासह सामाईक वाड्यात वास्तव्यास आहेत. ३० मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घराच्या दुरुस्तीचे साहित्य सामाईक वाड्यात ठेवण्याबाबत फिर्यादींचा मुलगा करण हा बोलण्यासाठी गेला होता. यावेळी पुतण्या मयूर मनोहर शिंदे याने तिथे येत जागा देण्यास मज्जाव केला आणि शिवीगाळ सुरू केली. हा वाद सोडवण्यासाठी अपर्णा शिंदे आणि त्यांची सून काव्या तिथे गेल्या असता, मयूरची पत्नी मयुरी शिंदे हिने सुनेचा हात पकडून तिला मारहाण व धक्काबुक्की केली. वाद विकोपाला गेल्यावर पुतण्या मयूर शिंदे याने घरातून लोखंडी पाईप आणून अपर्णा शिंदे यांच्या दोन्ही हाताच्या मनगटावर जोरात प्रहार केला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.
या मारहाणीत मयुरी शिंदे, कलावती मनोहर शिंदे आणि सुप्रिया केतन शिंदे यांनीही फिर्यादींना पकडून ठेवत मारहाणीस प्रोत्साहन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी हलवण्यात आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत खेड पोलिसांनी मयूर मनोहर शिंदे (वय ३६), मयुरी मयूर शिंदे (वय २८), कलावती मनोहर शिंदे (वय ५५) आणि सुप्रिया केतन शिंदे (वय २८) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार अस्मिता अमित साळवी करत असून, पोलीस निरीक्षक विवेक बाबूराव अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. सामाईक मालमत्तेच्या वादातून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.









