सामाईक जमिनीतील खैराच्या झाडांची चोरी

चिपळूण येथील घटना; नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील खरवते-विठ्ठलवाडी येथे सामाईक जमिनीतील सुमारे एक लाख रुपये किमतीची ४० खैराची झाडे मालकाच्या संमतीशिवाय तोडून चोरून विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

​फिर्यादी मंगेश कृष्णा घाग (वय ५७, सध्या रा. बोरीवली, मुंबई) यांची खरवते येथे सामाईक मालकीची जमीन (गट क्र. ८४८) आहे. आरोपी अनिरुद्ध चंद्रकांत घाग (रा. खरवते, विठ्ठलवाडी) याने ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीची कोणतीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने या जमिनीतील १० वर्षे जुनी खैराची झाडे मुळासकट तोडली. सुमारे २५ मण वजनाची ही ४० खैराची झाडे, ज्यांची किंमत १ लाख रुपये आहे, ती चोरून त्यांची परस्पर विक्री करण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगेश घाग यांनी पोलिसांत धाव घेतली.

​चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अनिरुद्ध घाग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिकृत नोंद १६ जानेवारी रोजी करण्यात आली. कोकणात खैराच्या झाडांना मोठी मागणी असल्याने अशा प्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.