Thursday, July 23, 2026
spot_img
Home दापोली साफसफाई करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

साफसफाई करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आडे कोळीवाडा येथे सार्वजनिक सभागृहात साफसफाई करत असताना पाय घसरून पडलेल्या महिलेचा विजेचा तीव्र शॉक लागून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८ वर्षे, रा. आडे कोळीवाडा, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या २१ जुलै रोजी संध्याकाळी आडे कोळीवाडी येथील झेंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहात इतर महिलांसोबत साफसफाईचे काम करत होत्या.

साफसफाई करत असताना सभागृहाच्या गॅलरीत अचानक त्यांचा पाय घसरून तोल गेला. तोल गेल्यामुळे त्यांचा हात सभागृहाच्या बाजूने गेलेल्या विजेच्या मेन लाईनच्या उघड्या तारेला लागला. वीजप्रवाह तीव्र असल्याने त्यांना जोराचा विजेचा शॉक बसला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी आंजर्ले येथील डॉ. पाटील यांच्याकडे व त्यानंतर अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

​या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची (आमृ. क्र. ५५/२०२६) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.