सात हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक कार्यालयातील शिपाई जाळ्यात 

चिपळूण:- शहरातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी सात हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. दीपक शांताराम पाष्टे (वय-४२) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वकिली व्यवसाय करणाऱ्या एका तक्रारदाराने बांधकाम व्यावसायिकाच्यावतीने एका इमारतीची गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. या इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी शिपायाने कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी १२ हजार रूपयांची मागणी केली. अखेर सात हजार रुपये देण्याचे ठरले.

शुक्रवारी दुपारी सहाय्यक निबंधक कार्यालयात हे सात हजार रूपये पाष्टे यांनी स्वीकारले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शिपाई पाष्टे याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, ओगले, कोळेकर, नलावडे व पवार यांनी सापळा ही धडक कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या प्रकरणी पाष्टे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.