रत्नागिरी:- बांधकाम कामाचे देयक मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना गुहागर येथील जिल्हा परिषदेचे उप अभियंता (वर्ग-१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. संजय तुळशीराम सळमाखे असे पकडलेल्या उप अभियंत्याचे नाव आहे. मंगळवार १६ डिसेंबर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आले होते. सदर देयकावर लोकसेवक संजय तुळशीराम सळमाखे यांची स्वाक्षरी आवश्यक होती.
तक्रारदार यांनी १२ डिसेंबर रोजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी सळमाखे यांच्या कार्यालयात गेले असता, उप अभियंता सळमाखे यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच देयकासोबत जोडलेल्या कामांच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी सात हजार रुपये लाचेची रकमेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार, एसीबीने सापळा रचला. मंगळवार १६ डिसेंबर रोजी उप अभियंता संजय सळमाखे यांनी तक्रारदार यांच्याकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली व ती रक्कम लगेच स्वीकारण्याचे मान्य केले.
मांगणी केलेली लाच रक्कम सात हजार रुपये उप अभियंता सळमाखे यांनी गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील त्यांच्या दालनामध्ये तक्रारदार यांचेकडून स्विकारल्यानंतर, एसीबीच्या पथकाने त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले.









