साताजन्माचा डाव अवघ्या एका महिन्यात सोडून गेला

महिन्यापुर्वी लग्न झालेल्या चंद्रवदनचा नाखरे येथे अपघाती मृत्यू

रत्नागिरी:-  नाखरे येथील हरहुन्नरी युवकाचा बुधवारी दुचाकी अपघातात दुर्देवी अंत झाला. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं या तरुणाचं नाव आहे. चंद्रवदन हा पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जात असताना त्याच्या दुचाकीला अपघाता झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. अवघ्या महिनाभरात त्याचा संसार असा मोडून पडल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या आंबा बागायत युवकाने अचानक जगातून एक्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. मयत तरुणाचे नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असे असून, तो नाखरे येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका चारचाकी इको गाडीशी जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडला.

चंद्रवदन हा एक हसतमुख चांगल्या स्वभावाचा तरुण असल्याचं त्याचे मित्र सांगतात. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नुकतेच महिन्याभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्याचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. अशा अचानक त्याच्या जाण्याने त्याची नवविवाहित पत्नीला मोठा धक्का बसला आहे. लेकाचं लग्न झाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. मात्र, या घटनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.