सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी 14 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात

रत्नागिरी:-खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाेंद करुन मंजूर करुन देण्यासाठी १४ हजारांची लाच घेताना भरणे ग्रामपंचायत कार्यालयातील मंडल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. सचिन यशवंत गाेवळकर (४३) असे ताब्यात घेतलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

भरणे येथील एका ७२ वर्षीय वृद्धाने जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर त्यांच्या नावाची नाेंद घालून ती मंजूर करुन देण्यासाठी अर्ज केला हाेता. या नाेंदीसाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ रुपयांची मागणी केली हाेती. त्यानंतर तडजाेडीनंतर १४ रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार त्यांनी बुधवारी भरणे ग्रामपंचायतीत १४ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. मंडल अधिकारी यांना रकमेसहीत ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरीचे पाेलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पाेलीस हवालदार विशाल नलावडे, पाेलीस नाईक याेगेश हुंबरे, दीपक आंबेकर, पाेलीस शिपाई हेमंत पवार, चालक पाेलीस शिपाई प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.