साडवलीत संशयावरून पत्नीला मारहाण; पती, सासूसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील साडवली कासारवाडी येथे संशयाच्या विकृत भूमिकेतून पतीने आपल्या पत्नीला लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत पत्नीच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून, आरोपींनी धमकावल्यामुळे फिर्यादीने सुरुवातीला अपघाताची खोटी माहिती दिली होती. मात्र, उपचारादरम्यान नातेवाईकांच्या मदतीने धाडस मिळाल्यावर पीडितेने देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी फिर्यादी सौ. उषा अक्षय पाटील (वय २४, रा. साडवली कासारवाडी) यांच्या राहत्या घरासमोरील पऱ्या जवळील झाडीझुडपात घडली. उषा पाटील यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पती अक्षय अशोक पाटील (वय ३०) हा दारूच्या व्यसनात असून, तो नेहमी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असे.

२० ऑक्टोबर रोजी अक्षय अशोक पाटील याने फिर्यादी आणि त्यांचा मुलगा आकाश यांना देवळे साखरपा येथून घरी आणले. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास अक्षय पाटील याने उषा यांना चालत घराच्या जवळ असलेल्या पऱ्याच्या बाजुच्या झाडीझुडपात नेले. त्या ठिकाणी अक्षय पाटील याने रागात येऊन त्यांना ‘कोणाकडे झोपायला गेली होती,’ अशी अश्लील शिवीगाळ करत, तेथे असलेल्या एका लाकडी बांबूने त्यांच्या डोक्यात, पाठीवर, दोन्ही हातांवर आणि दोन्ही पायांवर अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात उषा पाटील यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आणि अक्षय पाटील याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

याशिवाय, आरोपी श्रीमती शोभा अशोक पाटील (सासू) आणि अमोल अशोक पाटील (दीर) यांनी फिर्यादी उषा यांना, ‘सदर घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास आम्ही तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारू’ अशी गंभीर धमकी दिली. या धास्तीमुळे उषा पाटील यांनी सुरुवातीला सत्य सांगण्याचे टाळले.
घटनेनंतर २५ ऑक्टोबर रोजी पती अक्षय पाटील यानेच उषा यांना उपचारासाठी देवरुख येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे पोलिसांनी चौकशी केली असता, धमक्यांमुळे घाबरलेल्या उषा यांनी ‘मी गाडीवरून पडून मला दुखापत झाली’ अशी खोटी माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना, त्यांच्या बहिणी त्यांच्यासोबत आल्या. बहिणींच्या पाठिंब्यामुळे त्यांची भीती दूर झाली आणि त्यांनी २५ ऑक्टोबर रोजीच्या एमएलसी अहवाल क्र. ३६८३/२०२५ अन्वये आज रोजी पोलिसांना आपला सविस्तर जबाब दिला. या जबाबानुसार देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरुख पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय अशोक पाटील, श्रीमती शोभा अशोक पाटील व अमोल अशोक पाटील यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याचा गु.र.क्र. १२१/२०२५ अन्वये कलम ११८(१), ११८(२), ३५१(३), ३५२, ३(५) प्रमाणे गंभीर दुखापत आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.