साठरेबांबर शाळेतील शिक्षकाला पोक्सो अंतर्गत पाच वर्ष सक्तमजुरी 

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीतील तीन अल्पवयीन मुलींच्या मनात  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणातील आरोपी शिक्षकाला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ५ वर्ष सक्तमजूरी आणि ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रमेश रतन जाधव (५१,मुळ रा.पोचरी संगमेश्वर सध्या रा.नाणीज बौध्दवाडी,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीत शिक्षकाचे नाव आहे.तो गेली १४ वर्षे जिल्हा परिषद शाळा साठरेबांबर लावगणवाडी शाळा क्र.३ वर शिक्षक म्हणून नोकरी करत होता.त्याच्याविरोधात पीडीत मुलींच्या पालकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार,२४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा.पिडीत तीन्ही मुली शाळेत गेल्या होत्या.त्यावेळी रमेश जाधव याने त्यांना नवीन शाळेच्या युनिफॉर्मचे वाटप करुन त्यांना पुन्हा घरी पाठवून नवीन युनिफॉर्म घालून या असे सांगितले.त्याप्रमाणे मुली युनिफॉर्म बदलून पुन्हा शाळेत गेल्या असता दुपारी १.३० ते २ वा.सुमारास रमेश जाधवने इतर मुलांना वर्गाबाहेर बाहेर काढून तीन्ही मुलींना वर्गातच थांबा असे सांगितले.त्यानंतर रमेशने तीन्ही मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते.

   दरम्यान, दुसर्‍या दिवशी पिडीत मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यावर पालकांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.पालकांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी रमेश जाधव विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पी.आर.चव्हाण यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अनुपमा ठाकूर यांनी १३ साक्षिदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायाधिश वैजयंतीमाला राउत यांनी आरोपीला ५ वर्ष सक्तमजुरी आणि ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.