साटवली येथे बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

तब्बल १३ दिवसांनी उलगडा

लांजा:- तालुक्यातील साटवली गंगोवाडी येथे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अशोक लक्ष्मण सुर्वे (वय ५४, रा. साटवली गंगोवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते स्थानिक रहिवासी विजय सीताराम महाडीक यांच्या गोठ्यात मृतावस्थेत आढळून आले. सोमवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक सुर्वे हे आपला भाचा सौरभ कांबळे यांच्या घरी राहत होते. त्यांना दारूचे अतिव्यसन होते. याच नशेत ते वारंवार कोणालाही न सांगता घरातून निघून जात असत आणि दहा-पंधरा दिवसांनी परत येत असत. नेहमीप्रमाणे दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते दारूच्या नशेत घरातून निघून गेले होते. घरच्यांनी ते परत येतील या आशेने वाट पाहिली, मात्र ते परतले नाहीत.

दरम्यान, सोमवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास साटवली गंगोवाडी येथील विजय महाडीक यांच्या गोठ्यात एक मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पाहणी केली असता हा मृतदेह अशोक सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. नशेत असतानाच ते या गोठ्यात जाऊन पडले असावेत आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. मयताचा भाचा सौरभ कांबळे यांनी दिलेल्या खबरीनुसार लांजा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.